Pages

Wednesday, June 8, 2011

पहिला पाऊस

शाळेतला पहिला पाऊस
गारा वेचत अंगणात बागडणारा
संध्याकाळी धुमाकूळ घालणारा
डबक्यांतल्या होड्यांमध्ये ऐटीत फिरणारा
पावसाच्या गाण्यांवर फेर धरून नाचणारा

कॉलेजातला पहिला पाऊस
सिंहगडाचे वेध लावणारा
बाइकवर चिंब भिजणारा
चहा-भज्यांची चव चाखणारा
उगीचच नवी हुरहूर लावणारा

तारुण्यातला पहिला पाऊस
प्रियेवीण झूरणारा
मनाचे कवडसे अलगद खोलणारा
मातीचा मुग्ध सुगंध मनामध्ये साठवणारा
त्या पहिल्या भेटीच्या आठवणीत हळूवार बरसणारा

कामावरचा पहिला पाऊस
छत्री-रेनकोट मध्ये लपणारा
स्कूटरवर शिव्या पण गाडीत शीळ वाजवणारा
घरातल्या चहासाठी तरसणारा
मनातल्या मनातच लहान होऊन नाचणारा


पुन्हा येतो मग बालपणाचा पहिला पाऊस
भूतकाळ जिवंत करणारा
समाधानाने मन भरवणारा
किती हे पावसाळे पाहिले, याची गणती करणारा
आणि पिकांसाठी, रस्त्यांसाठी, रेल्वेसाठी आणि माणसासाठी प्रार्थना करणारा!

1 comment:

  1. Transferred epithet seems to be your favorite figure of speech

    ReplyDelete