लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म-पंथ जात एक, जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
परदेशात राहून आणि रोज इंग्रजी-हिंदीच्या धाकात वावरुन माय मराठीच्या माहेरास 2-3 दिवस जावे, अगदी असा होता माझा बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनाचा अनुभव. लहान-थोरांसाठी विविध कार्यक्रम, मान्यवरांची उपस्थिती, झकास जेवणाचा बेत आणि हो, एनहाइमसारख्या ठिकाणी - त्यामुळे अधिवेशनाला जायला मी एका पायावर तयार होते. माझे पहिलेच अधिवेशन, त्यामुळे अतोनात उत्साह, जास्तीत जास्त कार्यक्रम पाहण्याची प्रचंड इच्छा आणि तरीही "इंग्रजाळलेल्या आपल्या" हे फार डोक्यावरून तर जाणार नाही ना, अशी धाकधुकही होतीच.
मात्र एनहाइमला पोचताच ही धाकधूक हा हा म्हणता नाहीशी झाली. अधिवेशन एनहाइमच्या कन्वेन्षन सेंटर मध्ये होते. तिथे आमचे स्वागत केले श्री गणेशाच्या मूर्तीने - मूर्तीसमोर रांगोळी, फुलांची आरास आणि समई. ऐकूनच किती शांत वाटते नाही! इथून थोडेसे पुढे गेल्यावर दिसले एक भव्य चित्र - या चित्रात होते हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे श्रीशिवाजी महाराज, "ने मजसी ने, परत मातृभूमीला" सांगणारे सावरकर, पु.ल., लता मंगेशकर, नाना पाटेकर, माधुरी दीक्षित सारखे कलावंत व अर्थातच गावसकर सारखे कुशल क्रीडापटू - महाराष्ट्राची अनेक रत्नेच ही! एकेकाला पाहून माय मराठीबद्दल अभिमान वाटावा, व आपण आपोआप नतमस्तक व्हावे. साहजिकच दिवसातल्या कुठल्याही वेळेला या चित्राबरोबर फोटो काढण्यासाठी ही झुंबड असायची. 2nd जनरेशन भारतीयांसाठी ही उत्तम संधी होती या सर्व रत्नाची माहिती करून घ्यायची. मला ही कल्पना फारच आवडली.
अधिवेशनाच्या उद्घाटन सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. लॉस एन्जलीस मधील कलाकारांनीही नृत्य, जुगलबंदी सादर केले. पण तरीही प्रमुख आकर्षण ठरले बे एरियातील स्पार्टेन पथकाची लेझीम मिरवणूक! सॅन होजे मधील 15 विद्यार्थ्यांच्या गटाने ढोल-ताशे-झांज़ा यांचा अप्रतिम उपयोग करून विठ्ठल-गजर, शिवस्तुती, मनोरे अशी दणकेबाज सुरूवात अधिवेशनाला करून दिली.
या वेळच्या अधिवेशनाची "थीम" किंवा संकल्पना होती - मैत्र पिढ्यांचे. थोडक्यात, अमेरिकेतील भारतीयांच्या पिढ्यांचे एकमेकांतले नाते-संबंध, संवाद, आणि विचारांची देवाण-घेवाण आणि यातून नव्या पिढीवर होणारे संस्कार. याला अगदी साजेसे घोषवाक्य मनोज सरांनी रचले होते -
मैत्र पिढ्यांचे जपे वारसा
कला-संस्कृती-मायबोलीचा
पिढ्यांमधली मैत्रीच 'अमृतातेही पैजा जिंके' अशा मराठीच्या वैभवाला वाढवू शकते, आणि वाढत्या ग्लोबलाइसेशन मध्ये तर पिढ्यांमधील मैत्री अत्यंत महत्वाची आहे. अभि-भाषणाचे वक्ते - श्री. अच्युत गोडबोले - यांनी आपल्या भाषणात "जेनरेशन गॅप" कशी आणि का निर्माण झाली, आणि काय केल्यामुळे पिढ्या दूर न जाता सुखाने नांदतील याचा धडाच दिला. मागील सुट्टीतच त्यांचे "मुसाफिर्" पुस्तक वाचल्यामुळे, त्यांना प्रत्यक्षात पाहायचा आणि ऐकायचा योग काय जुळून आला म्हणून सांगू!
इतक्यातच मी खूश होते, आणि मग सुरू झाले दिवसभराचे कार्यक्रम. उत्तर अमेरिका आणि भारतातल्या उत्कृष्ट कवी, गायक-गायिका, सिने नट आणि नटी, तसेच बाळगोपाळ यांनी एक-से-एक कार्यक्रम सादर करण्याचा जणू विडा उचलला होता. एकीकडे महेश काळे यांचे तल्लीन करणारे कीर्तन, तर दुसरीकडे भारावून टाकणारी आनंद गंधर्व-आदित्य ओक यांची "गंधर्व" मैफिल. वरच्या खोल्यांमध्ये "राग-रंग" हा रागांवर आधारित गाण्यांचा सुश्राव्य प्रयोग, तर शेजारीच चिन्मय मांडलेकर, जितेंद्र जोशी यांचा "कथा-कोलाज" हा कथा-कथनाचा अंतर्मुख करणारा अनुभव. यात तरुण कलाकारही मागे नव्हते - "ओम कुत्राय नमः" हे अमेरिकेतल्या 5-6 मित्र-मैत्रिणींनी बसवलेले, इथल्या स्पर्धांमध्ये गाजलेले नाटक प्रेक्षकांची दाद मिळवून गेले. "सिनेमा 100: एक प्रवास" हा मराठी सिनेसृष्टीच्या मागील 100 वर्षांचा भारावून टाकणारा इतिहास दाखवणारा कार्यक्रम बे एरियामधील 50+ कलावंतांनी सादर केला. या कार्यक्रमास प्रशांत दामले सारखा सूत्रधार लाभणे, म्हणजे दुग्धशर्करा योगच.
संगीताचा वारसा पुढे नेणार्या उदयोन्मुख कलाकारांसाठी "बीएमएम सा रे ग म" एक भक्कम व्यासपीठ आहे. अमेरिका व कॅनडामध्ये या स्पर्धेची पहिली, दुसरी आणि उपांत्य फेरी पार पडली, त्याला 100 हून अधिक स्पर्धक होते. आणि त्यातील सर्वोत्कृष्ट स्पर्धकांना आनंद भाटे, अवधूत गुप्ते यांच्यासारख्या परीक्षाकांसमोर गाण्याची संधी मिळाली. आणि स्पर्धक तरी कसे - वाटणारच नाही की हा बाल गटातील स्पर्धक 5 वर्षांचा आहे, किंवा ही नाट्य-गीत सादर करणारी मुलगी अमेरिकेतच वाढली आहे, व हीच एरवी अमेरिकन आक्सेंट मध्ये बोलते! आणि मीही या स्पर्धेत भाग घेतल्यामुळे नक्की सांगू शकते - आयोजकांनी अतिशय सुंदर व्यवस्था केली होती. वेळेचा अपवाद वगळता कुठे बोट ठेवायला जागा नाही. आणि वेळेचे असे काय घेऊन बसलात, दर्दी लोकांना वेळेचे कसले हो भान!
अशा दिवसभरच्या कार्यक्रमांनी पोट भरले, की डिज़र्ट म्हणून होतेच - रात्रीचे "प्रिमियर" कार्यक्रम आणि सादर करणारे भारतातून आलेले आपले लाडके कलाकार! पहिली रात्र गाजवली "गोष्ट तशी गमतीची" या गमतीदार नाटकाने. लीना भागवतचे अचूक टाइमिंग आणि इतर कलाकारांनी तिला दिलेली साथ, यामुळे हे नाटक प्रभावशाली झाले. तसा याचा विषयही जेनरेशन गॅपशी निगडीत आहे, त्यामुळे अधिवेशनच्या संकल्पनेला धरून असा हा कार्यक्रम होता.
अवधूत गुप्ते-वैशाली सामंत यांचा दुसर्या रात्रीचा कार्यक्रम काहीसा ऑफ-बीट होता. त्यांचा अमेरिकेतील पहिलाच कार्यक्रम होता म्हणून असेल, किंवा रॉकचा प्रयोग मराठी रसिकाला अपेक्षित नव्हता म्हणून, पण दाजिबा, बाई बाई अशी ठराविक गाणी वगळता मैफिल तितकीशी जमली नाही!
आणि माहेरपणाचे 3 दिवस संपले की हो! या 3 दिवसात अनेक कार्यक्रम बघता आले, नवीन अनुभव मिळाले, नवीन लोक भेटले आणि मुख्य म्हणजे - हरवलेली मी-ही भेटले. शाळा-कॉलेजात अनेक कार्यक्रमांना आवर्जून जाणारी, वाचनात हरवून जाणारी, थोडेफार लेखन करणारी, नवीन गोष्टी करायची संधी न सोडणारी. रोजच्या जीवनाच्या धकाधकीत हे सगळे मागे पडले होते - पण आता नाही, आणि त्याचा पहिलाच प्रयोग म्हणजे हा लेख लिहायचा प्रयत्न. स्वतःला जाणण्यामध्येच कला, संस्कृती चे मूळ आहे, नाही का?
The Wall of Fame :) |